Tuesday, July 15, 2014

तोच खरा...

नको बांधूस वारा इतक्यात भिंती घालून,
होउ दे पराग स्वार तुझा त्या मरुवर,
जाऊ दे क्षितिजापल्याड त्याला तुझा अंश घेऊन,
कळू दे जगालाही ,
लाज सौंदर्याचीही असते इथे एका जातीला!

नको घालूस एवढ्या प्रदक्षिणा, दगडच शेवटी,
माझ्यासारखाच…तोही!
क्षुद्र, पायांना तुझ्या क्षुद्र अशा नेणिवाच आहेत.
ओझी मनातल्या वेदनांची का सोसावी कुणी?
जळू दे स्वप्नांना अशा,
झिजून दगडाची तुझ्या 'त्या' शेवटी मातीच होणार आहे…!!

नको मांडूस शब्दांत, चुकवून एक स्पंदन तुझ्या हृदयाचे,
जपून ठेव… विश्वासाने!
उतरू दे रक्तात सगळं, पुन्हा नव्या आश्चर्यासाठी,
लपू दे तिथेच त्याला… दारामागे, फडताळावर अगदी कुठेकुठेही…
सांभाळू नकोच पण अडवुही नको!
मग केव्हातरी एखाद्याला उमजेल… तोच खरा…
फक्त तुझ्याचसाठी धाडलेला!!!


राहुल कावरे,
अमरावती

Friday, May 2, 2014

वाचून बघा...! झेपली तर चांगलंच आहे...(माझ्यादृष्टीनं!)

या ब्लॉग वर एक संकेत मी आजवर पाळत आलेलो आहे तो म्हणजे 'सोप्या-सुटसुटीत कविताच इथे पोस्ट करणे'. जेणेकरून कुणाही वाचकाला अन्वयार्थ समजावून सांगण्याच्या भानगडीपासून सुटका होईल.
पण खूप दिवसांपासून ब्लॉगवर काहीही पोस्ट केलेलं नव्हतं आणि गेल्या काही काळापासून बोली भाषेतल्या कविता जुळून येत नव्हत्या. आता तर ब्लॉगची गरज म्हणून पोस्ट करणं आलं आहे म्हणून त्यातल्या त्यात सोप्पी अशी ही कविता निवडली आहे.
नाही कळली तरी काळजी करू नका, सोप्या कविताही जमतील पण त्याला वेळ द्यायला हवा आहे…तोपर्यंत धीर धरायला हवा आहे… तुम्ही आणि मीसुद्धा !


विसावा !

नाही अनुभवायचं, या दुराव्यातून आता काही
सुखापासून दुःखापर्यंत तसाच चाललोय मी !

वाहू दे जखमांतून रक्त भळभळत तसेच,
वाटा काट्यांच्या मुद्दाम तुडवत आलोय मी !

एकांतातला स्वर्ग जरी अनुभवला नाही कधी ,
परकेपणातल्या यातना पुरत्या अनुभवल्यात मी !

इभ्रतीच्या चामडीची लक्तरे जरी उधळली,
वर पाण्यासाठी मिठाच्या,आग्रह धरलाय मी !

काटेरी पायवाटेत त्या भिजलेल्या,प्रेमाच्या रक्ताने,
छिन्नभिन्न अवशेषही मनाचे,पाहिले होतेच मी !

सत्य अशा स्वप्नांच्या शोधात निघालो पुढे…
आशेवर एकाच,
दुःखाच्या मुक्कामानंतरच प्रेमाचं कुरण असतं…
तिथेच विसावेन मी !!!


                                          - राहुल राजेंद्र कावरे,
                                          अमरावती