Tuesday, July 15, 2014

तोच खरा...

नको बांधूस वारा इतक्यात भिंती घालून,
होउ दे पराग स्वार तुझा त्या मरुवर,
जाऊ दे क्षितिजापल्याड त्याला तुझा अंश घेऊन,
कळू दे जगालाही ,
लाज सौंदर्याचीही असते इथे एका जातीला!

नको घालूस एवढ्या प्रदक्षिणा, दगडच शेवटी,
माझ्यासारखाच…तोही!
क्षुद्र, पायांना तुझ्या क्षुद्र अशा नेणिवाच आहेत.
ओझी मनातल्या वेदनांची का सोसावी कुणी?
जळू दे स्वप्नांना अशा,
झिजून दगडाची तुझ्या 'त्या' शेवटी मातीच होणार आहे…!!

नको मांडूस शब्दांत, चुकवून एक स्पंदन तुझ्या हृदयाचे,
जपून ठेव… विश्वासाने!
उतरू दे रक्तात सगळं, पुन्हा नव्या आश्चर्यासाठी,
लपू दे तिथेच त्याला… दारामागे, फडताळावर अगदी कुठेकुठेही…
सांभाळू नकोच पण अडवुही नको!
मग केव्हातरी एखाद्याला उमजेल… तोच खरा…
फक्त तुझ्याचसाठी धाडलेला!!!


राहुल कावरे,
अमरावती

No comments:

Post a Comment